0

१३ एप्रिल रोजी शेमारूवर पहा 'बोनस' सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

मुंबई : शेमारू मराठीबाणाने आपल्या दर्शकांसाठी गुढी पाडव्याच्या निमित्ताने मनोरंजनाची खास मेजवानी आयोजित केली आहे. देखणा अभिनेता गश्मीर महाजनी आणि रसिकांच्या मनात स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंत या अतिशय लोकप्रिय जोडीचा चित्रपट ‘बोनस’ समाजातील वर्गभेदांवर उपहासात्मक भाष्य करताना, विनोदी वळणाने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करतो. १३ एप्रिल रोजी शेमारू मराठीबाणावर या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पाहणे ही प्रेक्षकांसाठी विशेष पर्वणी ठरेल हे नक्की!

'बोनस' च्या कथेमध्ये आदित्य हा तरुण त्याच्या कौटुंबिक व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांना बोनस देण्याच्या विरोधात असतो. आजोबांसोबत मतभेद झालेल्या आदित्यला ३० दिवसांसाठी कामगाराप्रमाणे आयुष्य जगण्याचे आव्हान दिले जाते. जर आदित्यने हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले तर त्याचे आजोबा कामगारांना बोनस देण्याची परंपरा बंद करतील असे ठरते.  आदित्यच्या आजोबांची भूमिका दिग्गज मराठी अभिनेते मोहन आगाशे यांनी साकारली आहे. आदित्य आपले सुखवस्तू आयुष्य सहजासहजी बाजूला सारू शकेल का? कोळीवाड्यात जाऊन सामान्य माणसाचे आयुष्य जगण्याचे आव्हान यशस्वीपणे पेलू शकेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणण्यासाठी गुढी पाडव्याच्या दिवशी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता नक्की पहा 'बोनस' सिनेमा शेमारू मराठीबाणा या चित्रपट वाहिनीवर!  

‘बोनस’ मधील आदित्य म्हणजेच अभिनेता गश्मीर महाजनी याने सांगितले, "आयुष्यात 'बोनस' हा केवळ पैशांच्या रूपातच मिळतो असं नाही. तर येणारा प्रत्येक क्षण तुम्ही कसा घालवता त्यावर तो अवलंबून असतो, हा संदेश देणारा 'बोनस' प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. मी साकारलेल्या आदित्यची भूमिका ही आजच्या तरुण पिढीचं नेतृत्व करणारी आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी प्रेक्षकांना ‘बोनस’ सारखा अत्युत्तम चित्रपट पाहता येणार आहे याचा मला खूप आनंद होतोय.  शेमारू मराठीबाणाच्या प्रेक्षकांसाठी ही मनोरंजनाची, आनंदाची गुढी नक्कीच संस्मरणीय ठरेल." 

'बोनस' ची नायिका अभिनेत्री पूजा सावंतने प्रतिक्रिया देताना सांगितले, "शेमारू मराठीबाणाने विविध शैलीतील मनोरंजन सादर करत आपल्या प्रेक्षकांना पुरेपूर आनंद मिळवून दिला आहे. आता ‘बोनस’ चित्रपट या शेमारू मराठीबाणाच्या प्रेक्षकांना पाहता येणार याचा मला खूप आनंद झाला आहे. हा सिनेमा आयुष्याचे वास्तव अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीने सांगतो आणि म्हणूनच तो प्रेक्षकांना आवडेल यात शंका नाही."

विचार करायला भाग पाडणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन सौरभ भावे यांनी केले आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी म्हणजे १३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता संपूर्ण कुटुंबासोबत शेमारू मराठीबाणावर 'बोनस' चा आस्वाद नक्की घ्या. त्यामुळे यंदा गुढी पाडव्याच्या दिवशी नव्या वर्षात मनोरंजनाचीही अतिशय दमदार सुरुवात करण्यासाठी सज्ज व्हा.

Post a Comment

 
Top